शिरुर:नाशिकचा भोंदू बाबा अशोक खरात याच्या काळया कृत्याची राज्यभर चर्चा होत आहे.रोज त्याचे नवे कारनामे पुढे येत आहेत.एका पीडित महिलेमुळे याचे कृत्य जगासमोर आले.मात्र त्याआधी पंचायत समितीचे माजी उपसभापती राजेंद्र जासूद यांनी या बाबाचा भांडाफोड करण्याचा प्रयत्न केल्याचे वास्तव समोर आले आहे.मात्र आपले बिंग फुटू लागल्याने या बाबाने आपल्यावर खोटा गुन्हा दाखल केल्याचे जासूद यांनी सांगितले.
शिरूरनामा न्यूज नेटवर्क
एका महिलेने लैंगिक अत्याचाराची तक्रार केल्यानंतर प्रथमच खरात याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला.त्याला अटक करण्यात आली.हा गुन्हा दाखल झाल्यापासूनच्या घडामोडी पाहता आजमितीला खात्यावर एकूण आठ गुन्हे दाखल झाले आहेत.त्याच्या मालमत्तेचा आश्चर्य करणारा डेटा समोर आला आहे.अजूनही त्याचे बरेचसे कारनामे पुढे येण्याची शक्यता आहे.एकूणच हा भोंदू बाबा किती भयंकर आहे हे सर्वांसमोर आले आहे.याच खरात चे काळे कारनामे जगासमोर आणण्याचा प्रयत्न करणाऱ्या जासूद यांच्यावरच या भोंदू बाबाने खंडणीचा गुन्हा दाखल केला आहे.केवळ आपले बिंग फुटेल या भीतीनेच खरात याने आपल्यावर खोटा गुन्हा दाखल केल्याचे जासूद यांनी सांगितले.
खरात याने पंधरा वर्षांपूर्वी सिन्नर तालुक्यातील मीरगाव येथे ईशान्येश्वर (शिवमंदिर) मंदिराची स्थापना केली होती.आपण शिवभक्त असल्याने खरात यांच्याकडे जात होतो.समाजातील सर्व स्तरातील लोक खरात कडे येत होती.यात सर्वसामान्य नागरिकापासून ते व्यावसायिक,राजकारणी यांचा समावेश होता.विविध क्षेत्रातील मंडळी याचे भक्त असल्याने खरात काही चुकीचे करीत असेल असे कोणाच्या गावी नव्हते.श्रद्धेच्या भावनेतून मी खरातकडे आकर्षित झालो होतो.मात्र कालांतराने खरातचे कारनामे समजू लागले.मात्र याबाबत पुरावे नसल्याने त्याच्या विरोधात काही करता आले नाही.त्याच्या विरोधात पुरावे गोळा करण्याचा प्रयत्न करीत असल्याचे व यातून आपले बिंग फुटेल या भीतीने खरात याने आपल्यावर खंडणीचा खोटा गुन्हा दाखल केल्याचे जासूद यांनी सांगितले.मी गेली तीसहून अधिक वर्ष राजकीय,सामाजिक जीवनात काम करीत आहे.या कालावधीत मी केवळ लोकांना मदतच करीत आलो आहे.माझे अनेक व्यवसाय असून आर्थिकदृष्ट्या सक्षम आहे.अशात हा दाखल झालेला खोटा गुन्हा क्लेशदायक वाटत आहे.कायद्याच्या चौकटीतून हा गुन्हा खोटा असल्याचे पुढे येईल असा विश्वास जासूद यांनी व्यक्त केला.