शिरूर नगरपरिषदेचा नगराध्यक्ष भाजपचाच होणार — जयश्री पलांडे

0

शिरूरनामा न्यूज नेटवर्क 

शिरूर:भाजपाची शहर व तालुक्यात मोठी ताकद असून भाजपामुळे शिरूर हवेलीचा आमदार निवडून आला आहे.याची जाणीव ठेवून राष्ट्रवादीने शिरूरच्या नगराध्यक्षपदासाठी भाजपला उमेदवारी सोडणे अपेक्षित असून यावेळी भाजपचाच नगराध्यक्ष निवडून येईल असा दावा भाजपच्या नेत्या,जिल्हा बँकेच्या माजी उपाध्यक्षा जयश्री पलांडे यांनी ”शिरूरनामा ” शी बोलताना व्यक्त केला.

राज्यात भाजपा व अजित पवार यांची राष्ट्रवादी एकत्र सत्तेत असले तरी शिरूर नगरपरिषदेच्या निवडणुकीसाठी सध्या तरी हे दोन पक्ष एकत्र आल्याचे चित्र नाही.दोन्ही पक्ष स्वतंत्रपणे उमेदवारांच्या मुलाखती घेताना दिसत आहेत.दोन्ही पक्षाने नगराध्यक्ष पदावर आपला दावा केला आहे.याबाबत बोलताना पलांडे म्हणाल्या,शिरूर तालुका हा जनसंघाचा तालुका आहे.बाबुराव दौंडकर यांनी या तालुक्याचे प्रतिनिधित्व केले आहे.यानंतर भाजपा म्हणून उदयास आलेल्या याच पक्षाने बाबुराव पाचर्णे यांच्या रूपाने २००४ तसेच २०१४ या कालावधीत तालुक्याचे प्रतिनिधित्व केले आहे.२००२ च्या नगरपरिषद निवडणुकीत प्रसिद्ध उद्योगपती रसिकभाऊ धारिवाल यांच्या पॅनल विरोधात भाजपाने निवडणूक लढवली. यावेळी जनतेतून नगराध्यक्ष निवडायचा होता.यात आम्ही गुलाब धाडीवाल यांच्या रूपाने नगराध्यक्ष पदावर मोहोर उमटवली.एकूणच भाजपाची तालुक्यातील तसेच शहरातील ताकद यामुळे अधोरेखित झाली.याच कारणामुळे शहरात यावेळी भाजपचाच नगराध्यक्ष होईल असा दावा पलांडे यांनी केला.

पलांडे म्हणाल्या,तालुक्यात भाजपाची ताकद असताना वरिष्ठ स्तरावरील समीकरणामुळे हा तालुका राष्ट्रवादीकडे गेला.मात्र भाजपच्या कार्यकर्त्यांनी प्रामाणिक व प्रभावीपणे काम केल्याने तसेच भाजपच्या पारंपरिक मतदारांनी भरघोस मतदान केल्याने राष्ट्रवादीचे माऊली कटके हे मोठ्या मताधिक्याने निवडून आले.आमदार आम्ही निवडून दिला.आता राष्ट्रवादीने भाजपचा नगराध्यक्ष निवडून देण्यासाठी सहकार्य करून राजकीय समतोल राखायला हवा अशी अपेक्षा पलांडे यांनी व्यक्त केली.२००२ साली शहरात भाजपचा नगराध्यक्ष निवडून आला तेव्हा राज्यात तसेच केंद्रात भाजपाची सत्ता नव्हती.आता दोन्हीकडे पक्षाची सत्ता असल्याने ताकद देण्याची विनंती महसूल, सार्वजनिक बांधकाम मंत्री चंद्रकांत पाटील यांच्याकडे केल्याचे पलांडे यांनी सांगितले.यावर पाटील यांनी ताकद देऊ असे आश्र्वासित केल्याचे पलांडे म्हणाल्या.केंद्रात पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शहा तर राज्यात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सारखी कणखर व विकासाची दृष्टी असणारी नेते मंडळी असल्याने यांच्या माध्यमातून झपाट्याने वाढणाऱ्या शिरूरच्या सर्वांगीण विकासासाठी मोठा निधी उपलब्ध होऊ शकणार असल्याने भाजपचाच नगराध्यक्ष होणे गरजेचे असल्याचे पलांडे म्हणाल्या. या सर्व सकारात्मक बाबींमुळे शिरूरमध्ये राष्ट्रवादीने (युती केल्यास )भाजपाला नगराध्यक्षपदाची जागा देणे अपेक्षित असल्याचे पलांडे म्हणाल्या.

Leave A Reply

Your email address will not be published.