शिरूरनामा न्यूज नेटवर्क
शिरूर:नगरपरिषदेसाठी अर्ज दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होण्यास अवघे तीन दिवस उरले आहेत.मात्र शिरूर शहर विकास आघाडी असो वा विरोधकांची आघाडी असो,कुठेही उमेदवार निश्चितीचे चित्र नाही.एकदाचा का ‘ आशीर्वाद ‘ मिळाला की प्रचार सुरू करायला उमेदवार मोकळे.
नगरपरिषदेसाठी दोन डिसेंबरला निवडणूक होत असून दहा नोव्हेंबरपासून अर्ज दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होणार आहे.१७ नोव्हेंबर अंतिम मुदत असून २१ नोव्हेंबर अर्ज माघारीचा दिवस आहे.तसा हा फार कमी कालावधी असल्याने उमेदवार निवड,त्यानंतर अर्ज दाखल करणे ही प्रक्रिया पॅनेल प्रमुखांना फार वेगाने करावी लागणार आहे.आजची परिस्थिती पाहता शिरूर शहर आघाडीकडे दोनशेहून अधिक इच्छुकांनी उमेदवारीसाठी अर्ज दाखल केले असल्याचे समजते. भाजपा तसेच राष्ट्रवादी काँग्रेस ( अजित पवार गट) या पक्षाकडेही अनेक इच्छुकांनी उमेदवारीची मागणी केल्याचे समजते.वाघोली तसेच शिरूर येथे राष्ट्रवादी ने उमेदवारांच्या मुलाखतीही घेतल्या आहेत.भाजपनेही शंभरहून अधिक इच्छुकांच्या मुलाखती घेतल्याचे समजते. शिरूर शहर आघाडी पॅनेल कडून सर्वाधिक इच्छुक आहेत.मात्र निवडणूक जाहीर झाल्यापासून आघाडीचे सर्वेसर्वा प्रकाश धारीवाल हे अद्याप शिरूरला आले नसल्याने इच्छुक त्यांची चातका प्रमाणे वाट पाहात आहेत.धारीवाल कुटुंबीयांचे शहरावर कायम वर्चस्व राहिले असून विकासासाठी अनेकदा कोटी मध्ये स्वनिधी दिल्याने आणि त्यांच्या अधिपत्याखाली शिरूरकर स्वतःला सुरक्षित अनुभवत असल्याने त्यांचेच नेतृत्व या शहरावर असावे अशी बहुतांशी शिरूरकरांची इच्छा आहे.हे वास्तव आहे.
धारीवाल हे आज शिरूरला येण्याची शक्यता असून त्यानंतर घडामोडींना वेग येणार आहे.इच्छुकांच्या मोठ्या संख्येतून आघाडीला नगराध्यक्षपदाचा एक तर नगरसेवक पदाचे २४ उमेदवार उमेदवार निवडण्याचे मोठे जिकिरीचे काम करावे लागणार आहे.याबरोबरच इतर पक्षांनी जर आघाडीकडे जागांची मागणी केली तर,त्यांचेही समीकरण जुळवण्याची कसरत आघाडीला करावी लागणार आहे.एकूणच परवा पासून याचे चित्र स्पष्ट होण्याची चिन्हे असून कोणकोणाला ‘ आशीर्वाद ‘ मिळतोय हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.२००७ पासूनचा इतिहास पाहता,भाजपा वगळता इतर पक्षाने शहर आघाडी सोबत ठराविक जागा घेऊन निवडणूक लढवली आहे.माजी आमदार अशोक पवार हे नेहमीच आघाडी सोबत राहिले आहेत.त्यांचे तत्कालीन वरीष्ठ अजितदादा पवार यांनीही कायम धारीवाल यांच्या आघाडी सोबत अनुकूलता दाखवलेली आहे.सध्या माऊली कटके हे दादांच्या पक्षाचे शिरूर हवेलीचे आमदार असून यावेळीही दादा आघाडीसोबत अनुकूल असण्याची शक्यता आहे.शिवसेनेचे माजी खासदार यांनी देखील आघाडीसोबत अनेकदा जुळवून घेतल्याचे वास्तव आहे.यावेळीही त्यांची भूमिका कायम असण्याची शक्यता आहे.भाजपची भूमिका गुलदस्त्यात आहे.या पक्षांची भूमिका काही असली तरी इच्छुक मात्र भाऊंच्या “आशीर्वादा ”च्या प्रतीक्षेत आहेत.एक विशेष म्हणजे महायुती पक्षातील तीनही पक्षातील बरेचसे इच्छुक प्रकाश भाऊंचे समर्थक आहेत.
शिरूर शहर आघाडीच ठरवणार शिरूरचा नगराध्यक्ष !
गुलाब धाडीवाल यांच्या रूपाने भाजपाने शिरूरचे नगराध्यक्ष पद खेचून आणले होते. मात्र त्यानंतर आघाडीचाच उमेदवार नगराध्यक्ष बनला आहे.मागील निवडणुकीत भाजपने साडेपाच हजाराहून अधिक मते घेतली. मात्र आघाडीने दुपटीने मते मिळवून नगराध्यक्ष पदावर आपली मोहोर उमटवली होती.त्यावेळी माजी आमदार बाबुराव पाचर्णे यांनी भाजपचे नेतृत्व केले होते.भाजपकडे आता पाचर्णे यांच्या सारखा लोकनेता नाही.अशात भाजपचा पवित्रा कसा असेल हे पाहणे औत्सुक्याचे ठरेल.