कोणी विकास आघाडीची उमेदवारी देतं का?

0

 

शिरूर:नगरपरिषद निवडणुकीसाठी शहराच्या बाराही प्रभागात बहुतांशी इच्छुकांना शिरूर शहर विकास आघाडीची उमेदवारी हवी आहे.जाहीर झालेला निवडणूक कार्यक्रम पाहता,मर्यादित वेळेत उमेदवारी देण्याची मोठी डोकेदुखी आघाडीसमोर असणार आहे.
दोन डिसेंबरला निवडणूक होणार आहे.१० नोव्हेंबरला अर्ज दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होणार असून १७ नोव्हेंबर पर्यंतच अर्ज दाखल करता येणार आहे.२५ नोव्हेंबर उमेदवारी अर्ज मागे घेण्याची अंतिम मुदत आहे.एवढ्या कमी वेळेत उमेदवार अंतिम करणे हे विकास आघाडीसमोर मोठे आव्हान असणार आहे.सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार ३१ जानेवारी पर्यंत निवडणूक प्रक्रिया राबविणे निवडणूक आयोगाला बंधनकारक होते. यातून निवडणुकीची शक्यता बळावल्याने गेल्या काही दिवसांपासून इच्छुक सोशल मीडियाच्या माध्यमातून आपली इच्छा प्रकट करीत आहेत. २००७ पासून नगरपरिषदेवर शिरूर शहर विकास आघाडीचे वर्चस्व आहे. शिरूर शहर विकास आघाडीची उमेदवारी म्हणजे विजयाची हमखास खात्री.या समीकरणामुळे या निवडणुकीतही शहरातील सर्व १२ प्रभागात जे इच्छुक आहेत त्यापैकी बहुतांशी इच्छुकांना आघाडी कडूनच निवडणूक लढवण्याची इच्छा आहे.अर्थात जागा मर्यादित आणि इच्छुकांची संख्या अमर्यादित अशा स्वरूपाचे चित्र आहे. संधी ही कोणा एकालाच मिळणार आहे. इच्छुकांची संख्या अमर्यादित असल्याने यातून उमेदवार निवडणे ही मोठी डोकेदुखी आघाडी समोर असणार आहे. प्रसिद्ध उद्योगपती माजी नगराध्यक्ष प्रकाश धारीवाल हे या आघाडीचे सर्वेसर्वा आहेत.(मात्र तरीही सर्वांना विश्वासात घेऊनच ते निर्णय घेताना दिसतात.)ॲड. सुभाष पवार या आघाडीचे अध्यक्ष आहेत.इतरही सदस्य यात कार्यरत आहेत.शहरातील बहुतांशी सर्वच पक्षाचे नेत्यांचा या आघाडीला पाठिंबा असतो. आघाडी मात्र पक्षविरहित असते. ही नेतेमंडळी आपापल्या परीने आघाडीकडे आपल्या ठराविक जागांसाठी आग्रह धरताना दिसते.

२००७ पासून ची परिस्थिती पाहिल्यास लोकशाही क्रांती आघाडी तसेच भाजपा यांनी या आघाडीच्या विरोधात पॅनल उभे केले. मात्र प्रत्येक वेळी आघाडीने बाजी मारली.भाजपाचे ताकदवान नेते माजी आमदार बाबुराव पाचर्णे यांच्या नेतृत्वाखाली भाजपाने आघाडीला चांगली टक्कर देण्याचा प्रयत्न केला. तरीही भाजपाचा निभाव इथे लागू शकला नाही. पाचर्णे यांचे निधन झाल्याने आता त्यांच्या इतका प्रबळ विरोधकही शहरात उरलेला नाही. लोकशाही क्रांती आघाडीचे नेते देखील शिरूर शहर विकास आघाडी सोबत येण्याची शक्यता आहे. अशात शिरूर शहर विकास आघाडीला ही निवडणूक एकतर्फी झाल्याचे दिसते.याच कारणाने प्रत्येकाला विकास आघाडीकडूनच उमेदवारी हवी आहे.यात कोणाची लॉटरी लागते हे काही दिवसांत समजेलच.यंदा आघाडीच्या विरोधात कोण असेल हे अद्याप स्पष्ट झालेले नाही.यामुळे आघाडीकडून उमेदवारी न मिळालेले इच्छुकांना कोणता प्लॅटफॉर्म मिळतोय हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.