शिरूरनामा न्यूज नेटवर्क
शिरूर:नगरपरिषदेच्या निवडणुकीसाठी घड्याळ समर्थकांनी तुतारी,तुतारी समर्थकांनी कमळ तर कमळ समर्थकांनी कोणी तुतारी तर कोणी घड्याळ स्वीकारल्याचे चित्र दिसून आले.विचारधारेचा विचार करण्यापेक्षा आता जो झेंडा हाती आला तो घेऊन ही मंडळी निवडणूक रिंगणात दिसणार आहेत.
शिरूर शहर विकास आघाडीचे सर्वेसर्वा प्रकाश धारीवाल यांनी निवडणूक न लढवण्याचा निर्णय घेतल्यानंतर पक्ष स्तरावर निवडणूक होणार ही बाब निश्चित झाली होती. महायुती विरुद्ध महाविकास आघाडी असा सामना रंगेल असा कयास होता. महाविकास आघाडी एकत्र निवडणूक लढवीत आहे. मात्र आज उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या शेवटच्या दिवशी महायुतीतील राष्ट्रवादी भाजपा व शिवसेना या तीनही पक्षाने स्वतंत्रपणे अर्ज दाखल केले. महाविकास आघाडी व महायुती या मधील एकूण मिळून सहा पक्षाचे जे उमेदवार आहेत यातील बहुतांशी उमेदवार हे धारिवाल समर्थक आहेत.मात्र आता पक्षीय स्तरावर निवडणूक होत असताना पुढे काय चित्र निर्माण होते हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.नगराध्यक्षपद ओबीसी महिला राखीव असून या पदासाठी दाखल झालेले अर्ज पाहता सर्वच उमेदवार हे धारिवाल समर्थक आहेत.यात भाजपच्या वतीने माजी नगराध्यक्ष सुवर्णा लोळगे,राष्ट्रवादी अजित पवार गट यांच्या वतीने पाचर्णे,महाविकास आघाडीच्या वतीने माजी नगरसेविका अलका खांडरे ,शिवसेना (शिंदे गट) यांच्या वतीने माजी नगरसेविका रोहिणी बनकर यांनी आपले अर्ज दाखल केले.शहरातील १२ प्रभागात एकूण २४ उमेदवार आहेत.आघाडीने निवडणूक न लढवण्याचा निर्णय घेतल्यानंतर सर्वच पक्षांपुढे उमेदवार निवडीचे आव्हान होते. प्रथमतः प्रत्येक उमेदवाराने आपल्या विचारधारेच्या अथवा ज्या पक्षाचे काम करतो त्या पक्षाकडे उमेदवारासाठी आग्रह धरला.मात्र पक्षाने उमेदवारी नाकारल्यानंतर हे उमेदवार दुसऱ्या पक्षाच्या गळाला लागल्याचे दिसून आले. माजी नगरसेवक अभिजीत पाचर्णे यांच्या पत्नी ऐश्वर्या पाचर्णे या भाजपाकडून निवडणूक लढणार असा कयास होता. याबाबत त्यांनी भाजपाकडे मागणीही केली होती.मात्र ऐन वेळेस निर्णय बदलून राष्ट्रवादीचे घड्याळ हाती घेतले.यामुळे भाजपला स्ट्राँग उमेदवाराची गरज होती.विकास आघाडीच्या निर्णयानंतर लोळगे या शांत होत्या.मात्र भाजपाने त्यांना विचारणा केल्यावर त्यांनी होकार दर्शवला.(विशेष म्हणजे,विधानसभा निवडणुकीत पाचर्णे व लोळगे या दोघांनीही माजी आमदार अशोक पवार यांचे काम केलेले आहे.)महाविकास आघाडीकडे माजी नगरसेविका अलका खांडरे यांची उमेदवारी सुरुवातीपासूनच पक्की मानली जात होती.त्यानुसार त्यांनी आज आपला अर्ज दाखल केला.
प्रभाग उमेदवारीचा तिढा अगदी आज दुपारपर्यंत पूर्णतः सुटलेला नसल्याचे चित्र दिसून आले.सर्वच पक्षात उमेदवारी देण्यावरून गोंधळलेली अवस्था पहावयास मिळाली.भाजपाचे जिल्हा पदाधिकारी मितेश गादीया यांनी आठ नंबर प्रभागात महाविकास आघाडीकडून तुतारी चिन्हावर अर्ज दाखल केला.राष्ट्रवादी( शरद पवार गट)चे जिल्हा उपाध्यक्ष निलेश पवार यांनी कमळ हाती घेतले.माजी आमदार अशोक पवार यांचे समर्थक संतोष थेऊरकर यांनी देखील पाच नंबर प्रभागात कमळ हाती घेतले. कमळ चिन्हावर नगराध्यक्ष म्हणून निवडून आलेले माजी नगराध्यक्ष गुलाब धाडीवाल यांच्या कन्या नीलम धाडीवाल (संघवी) यांनी महाविकास आघाडीकडून तुतारी चिन्हावर अर्ज दाखल केला.काँग्रेसच्या पदाधिकारी माजी नगरसेविका संगीता मल्लाव यांनी ऐनवेळी घड्याळ हाती घेतले.माजी आमदार पवार यांचे समर्थक सागर नरवडे यांनीही सात नंबर प्रभागात कमळ हाती घेतले.मनसेचे पदाधिकारी अविनाश घोगरे यांनी घड्याळ हाती घेतले.एकूणच स्थानिक स्तरावर इच्छुकांनी पक्ष विचार बाजूला ठेवून उमेदवारी स्वीकारल्याचे चित्र आहे.कदाचित ते मनात म्हणतही असतील,” विठ्ठला कोणता झेंडा घेतला हाती “!