शिरूरनामा न्यूज नेटवर्क
शिरूर: नगरपरिषदेमध्ये कोणता पक्ष कोणासोबत येणार व सत्ता स्थापन करणार हे अद्याप निश्चित झाले नसल्याने सत्तेचा पेच निर्माण झाला आहे.याबाबत शिरूरकरांची उत्सुकता ताणली गेली आहे.
नगरपरिषेमध्ये जनतेतून झालेल्या अध्यक्ष निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसच्या ऐश्वर्या पाचर्णे या विजयी झाल्या.मात्र त्यांचे २४ पैकी केवळ सातच नगरसेवक निवडून आले आहेत.अकरा जागा जिंकून भाजप सर्वात मोठा पक्ष ठरला आहे.महाविकास आघाडीचे पाच नगरसेवक निवडून आले असून अपक्षाला एक जागा मिळाली आहे.बहुमतासाठी तेरा जागा आवश्यक आहेत.निकालाच्या दिवशी आमदार माऊली कटके,नवनिर्वाचित नगराध्यक्ष पाचर्णे व राष्ट्रवादीचे नगरसेवक यांनी प्रसिद्ध उद्योगपती प्रकाश धारीवाल यांच्या निवासस्थानी जाऊन त्यांची सदिच्छा भेट घेतली होती.त्याचवेळी तिथे धारीवाल यांचे कट्टर समर्थक माजी नगराध्यक्ष,नवनिर्वाचित नगरसेवक रवींद्र ढोबळे हे देखील धारीवाल यांच्या भेटीसाठी उपस्थित होते.त्यावेळी धारीवाल यांनी सर्वांना उद्देशून,सर्वांनी एकत्र काम करा असा सल्ला दिला.या माहोल मध्ये ढोबळे यांनी राष्ट्रवादीसोबत जाण्याचे सूतोवाच केले.आमदार कटके यांनीही सकारात्मक प्रतिसाद दिला.या बाबतच्या बातम्याही माध्यमांमधून प्रसिद्ध झाल्या.या गोष्टीला चार दिवस उलटले मात्र अद्याप अधिकृतरित्या युतीचे जाहीर करण्यात आले नाही.यासाठी गेल्या काही दिवसांपासून बैठकांचे सत्र सुरू आहे.मात्र निकाल काही लागेना.महाविकास आघाडीचे ( सर्व तुतारी चिन्हावरचे)जवळपास सर्वच नगरसेवक राष्ट्रवादीसोबत जाण्यास अनुकूल दिसत आहेत.मात्र माजी आमदार अशोक पवार यांचा ग्रीन सिग्नल मिळत नसल्याने निर्णय होत नसल्याचे चित्र आहे.बापूंचा आशीर्वाद मिळवण्याचे जोरकस प्रयत्न सुरू आहेत.याबाबत आज जोरदार घडामोडी होतानाचे चित्र आहे.जो काही निर्णय असेल तो आजच होणे अपेक्षित आहे.
एकीकडे असे चित्र असताना भाजप मध्ये अस्वस्थता दिसत आहे.त्यांना बहुमतासाठी फक्त दोन जागांची गरज आहे.मात्र राष्ट्रवादी काँग्रेस त्यांच्या सोबत जायला तयार नाही.महाविकास आघाडीशी जुळवून घेण्यासाठी त्यांनी चाचपणी केली मात्र त्यात त्यांना काही यश मिळाले नाही.यामुळे सत्तेचा पेच निर्माण झाला आहे.