प्रवीण गायकवाड
शिरूर रांजणगाव औद्योगिक वसाहतीतील महाराष्ट्र एन्व्हायरो पॉवर लिमिटेड या कारखान्याच्या समस्यांची ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी दखल घेतली असून उद्या ते या कारखान्याला भेट देऊन पाहणी करणार आहेत.गेल्या अठरा वर्ष या कारखान्याच्या परिसरातील जनतेचा आक्रोश आजपर्यंत दाबला जात होता.पवार यांच्या भेटीनंतर या जनतेला न्याय मिळेल का?त्यांचा हा दौरा यशस्वी होईल का? हा खरा प्रश्न आहे.
राज्यातील मुंबई वगळता इतर भागातील घातक कचरा प्रक्रिया करण्यासाठी २००९ साली रांजणगाव औद्योगिक वसाहतीत महाराष्ट्र एन्व्हायरो पावर लिमिटेड हा प्लांट सुरू झाला.थेट जमिनीत गाडणे, घातक कचरा व प्रक्रिया करून गाडणे व तिसरे प्रक्रिया म्हणजे कचरा जाळणे.अशा स्वरूपाचे या कंपनीचे काम आहे. तीन हजारच्या आत कचऱ्याची कॅलरीफिक व्हॅल्यू असेल तर तो जमिनीत गाडला जाऊ शकतो. कॅलरीफिक व्हॅल्यू तीन हजाराच्या वर असेल तर तो कचरा जाळला जातो. त्या कंपनीने कचरा जाळण्यासाठी प्लाझ्म क्लासिफिकेशन व्हेरिफाइड रिअॅक्टर (PGVR) ही टेक्नॉलॉजी अमेरिकेहून आयात केली होती.यंत्रणा फारशी यशस्वी झाले नाही.अशी चर्चा आहे. जो कचरा जाळणे अपेक्षित होते तो कचरा देखील या कंपनीने गाडल्याचा सातत्याने आरोप केला गेला. परिणामी कंपनी सुरू झाल्यापासून काही वर्षातच सभोवतालच्या गावातील पाण्याचे स्त्रोत दूषित झाल्याचे आढळून आले. जमिनीवरील पिके यामुळे जळाली.या संदर्भात त्यावेळी काहींनी आंदोलने केली.आंदोलनामुळे प्रश्न सुटला नाही.आंदोलने मात्र थांबली.यामुळे समस्या तशाच राहिल्या.कंपनी केमिकलयुक्त पाणी बाहेर सोडत असल्यामुळे पुढे ढोकसांगवी सह निमगाव भोगी,सोने सांगवी,शिरूर ग्रामीण,अण्णापुर,आमदाबाद,कारेगाव,सरदवाडी, फलके मळा,कर्डेलवाडी,तर्डोबावाडी आदी गावांमधील पाण्याचे स्त्रोत खराब झाल्याच्या तक्रारी या गावातील ग्रामस्थांनी केल्या.
गेल्या अठरा वर्षात असंख्य वेळा यापैकी अनेक गावातील पाण्याचे नमुने तपासले गेले.यामध्ये पाणी पिण्यायोग्य नसल्याचे,रसायन मिश्रित असल्याचे अहवाल वेळोवेळी प्राप्त झाले.मात्र महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ तसेच केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळाने याबाबत कधीही ठोस कारवाई केली नाही.परिणामी कंपनीने दूषित पाणी सोडण्याचे प्रकार थांबवले नाहीत.रांजणगाव औद्योगिक वसाहत हा भाग आंबेगाव विधानसभा मतदारसंघात येतो. या मतदारसंघातील लोकप्रतिनिधीने देखील गेल्या अठरा वर्षात ठोस अशी भूमिका न घेतल्याने या गावांच्या समस्या उग्र होत गेल्या.अठरा वर्षात परिसरातील तसेच तालुक्यातील अनेक पुढारी,नेत्यांनी या कारखान्याला अभय द्यायचा प्रयत्न केला. या बदल्यात ही मंडळी गडगंज झाली.आर्थिक स्वार्थापोटी लोकांच्या समस्यांचा त्यांना विसर पडला.यापैकी अनेक पुढारी आज लोकप्रतिनिधींच्या फार जवळ आहेत.गेली काही महिन्यांपासून उपरोक्त नमूद गावांमधील ग्रामस्थांनी या कारखान्या विरोधातील लढा तीव्र केला.
गेल्या पंधरवड्यात निमगाव भोगीच्या सरपंच ज्योती लक्ष्मण सांबारे यांचे नेतृत्वाखाली शिष्टमंडळाने शरदचंद्र पवार राष्ट्रवादी काँग्रेस चे अध्यक्ष शरद पवार यांची भेट घेऊन आपले गाऱ्हाणे त्यांच्यासमोर मांडले. पवार यांनी याची दखल घेऊन स्वतः कंपनीला भेट देऊन पाहणी करण्याचे आश्वासन दिले.याचवेळी त्यांनी पर्यावरण मंत्री पंकजा मुंडे तसेच उद्योग मंत्री उदय सामंत यांनाही संपर्क साधून भेट देण्याचे आवाहन केले. त्यानुसार उद्या हे तिघेही महाराष्ट्र एन्व्हायरो पॉवर लिमिटेड या कारखान्याला भेट देणार आहेत. पवार मुंडे व सामंत यांच्या भेटीने गेली अनेक वर्ष समस्यांनी ग्रासलेल्या या दहा गावांमधील ग्रामस्थांना न्याय मिळेल का हा प्रश्न आहे.प्रश्न यासाठी कारण गेली कित्येक वर्ष या कारखान्याचे विरोधात संघर्ष सुरू असताना याची कोणत्याच सरकारने दखल घेतली नाही.हा कारखाना राज्यातील एका माजी खासदाराचा असून या खासदाराचे सर्वच पक्षाशी प्रचंड जवळकीचे संबंध आहेत.यामुळेच की काय या कारखान्याला हात लावण्याची कोणाची किंमत झाली नाही.पवार काय करतात पाहूया.