एम ई पी एल सारखे उद्योग गरजेचे — शरद पवार 

मात्र योग्य ती काळजी घेणे गरजेचे,बाधित शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळावी अशी पवारांची अपेक्षा

0

प्रवीण गायकवाड

शिरूर: एका कारखान्यामुळे जमिनीचा पोत खराब झाला,पाण्याचे स्त्रोत खराब झाले,ग्रामस्थांना कॅन्सर, किडनी आदी आजार जडले.यामुळे प्रभावीत शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळावी.असे शरदचंद्र पवार राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी स्पष्ट केले.मात्र असे प्रकल्प गरजेचे आहेत असेही त्यांनी अधोरेखित केले.यामुळे एम ई पी एल हा कारखाना रांजणगाव औद्योगिक वसाहतीतच राहणार का?व ते आपला निष्काळजीपणा असाच पुढे सुरू ठेवणार का? हा प्रश्न अनुत्तरीत राहिला आहे.
          निमगाव भोगी येथील शिष्टमंडळाने मागील पंधरवड्यात पवार यांची भेट घेऊन एम ई पी एल या कारखान्या संदर्भातील समस्यांचा पाढा त्यांच्यासमोर वाचला होता.या अनुषंगाने पवार यांनी कंपनीला भेट देऊन पाहणी करण्याचा शब्द या शिष्टमंडळाला दिला होता.यानुसार आज पवार व राज्याचे उद्योग मंत्री उदय सामंत यांनी या कारखान्याला भेट दिली. कारखान्याच्या मागील बाजूने सोडण्यात येणारे दूषित पाण्याची जागा त्यांनी पाहिली.यावेळी ग्रामस्थांनी एम ई पी एल संदर्भातील विविध समस्या पवार व सामंत यांच्यासमोर मांडल्या.या पाहणीनंतर आयोजित छोट्या सभेत ग्रामस्थांना संबोधित करताना पवार यांनी प्रभावीत गावांमधील शेतकरी ग्रामस्थांना बद्दल काळजी,सहानुभूती व्यक्त केली.त्यांना नुकसान भरपाई मिळावी असेही ते म्हणाले.मात्र एम इ पी एल सारखे प्रकल्प गरजेचे असतात असेही स्पष्ट सांगितले.पवार म्हणाले,असे प्रकल्प गरजेचे असले तरी त्यांनी योग्य ती काळजी घ्यायला हवी.एम ई पी एल कारखान्यांने मात्र अशी काळजी घेतली नसावी.  
          खरे तर शेकडो एकर जमिनी ज्या कारखान्यामुळे नापीक झाल्या.परिसरातील पाण्याचे स्त्रोत खराब झाले.असंख्य जनावरे दगावली.शेतकरी ग्रामस्थ अनेक आजारांना बळी पडले.अशा कारखान्यावर खूप आधीच गुन्हा दाखल व्हायला हवा होता.गुन्हा तर दूरच मात्र स्थानिकांचा आवाज दाबण्याचाच प्रयत्न होत राहिला. कथीत आंदोलकांनी व पुढाऱ्यांनी शेतकरी व ग्रामस्थांना साथ देण्या ऐवजी आपल्या तुंबड्या भरण्याची कामे केली. महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ तसेच केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळ यांनी कायमच बघ्याची भूमिका घेतली.पवार यांच्या वक्तव्यानुसार, अशा प्रकल्पांनी पूर्ण काळजी घ्यायला हवी.मात्र प्रचंड मोठा राजकीय वरदहस्त असणाऱ्या या कारखान्याने गेली १८ वर्ष निष्काळजीपणे आपला कारभार चालू ठेवला.अशा कारखान्याकडून खरे तर अपेक्षा करणेच चुकीचे आहे.उद्योग मंत्री आले की, त्यांच्या मागेपुढे व्यवस्थापन अधिकारीच काय तर मालकही मागे पुढे पळताना दिसतात.आज मात्र उद्योग मंत्री सामंत आले असताना देखील एम ई पी एल चा कुठलाही अधिकारी तिथे उपस्थित नव्हता.हे विशेष.पाहणी करताना या अधिकाऱ्यांना तिथे पाचारण का करण्यात आले नाही.हा देखील एक प्रश्न आहे.आजच्या दौऱ्याचे फलित काय हे यथावकाश समजेलच.मात्र पवार, सामंत यांची वक्तव्ये पाहता फारसे काही या ग्रामस्थांच्या हाती लागेल असे वाटत नाही.
चौकट
या कारखान्याला ६२ हेक्टर वाढीव क्षेत्र देण्याचा निर्णय एमआयडीसी ने घेतला आहे.यास निमगाव भोगीसह इतर सहा गावांचा प्रचंड विरोध आहे. पुढील निर्णय होईपर्यंत एमआयडीसी ने हा निर्णय तहकूब करावा.अशी अपेक्षा पवार यांनी व्यक्त केली.मुळात या परिसरातील ग्रामस्थांना हा प्रकल्पच येथे नको आहे. या प्रकल्पाच्या निष्काळजीपणामुळे या परिसराचे भविष्य अंधारमय झाले आहेच.मात्र भविष्यात घोडनदीचे पाणी देखील दूषित होण्याची शक्यता आहे. यामुळे हा प्रकल्प येथून हलवण्याची आवश्यकता आहे.अशी मागणी जोर धरू लागली आहे.या मागणीला पवारांसारखे विरोधक तसेच सत्ताधारी सामंतांचा प्रामाणिक पाठिंबा मिळेल का?हा प्रश्न आहे.
Leave A Reply

Your email address will not be published.