धारीवालांच्या विकासाचे अनुकरण महाविकास आघाडी करेल – अशोक पवार

0

शिरूरनामा न्यूज नेटवर्क

 

शिरूर :नगरपरिषदेच्या निवडणुकीतून शहर विकास आघाडीने माघार घेतल्यानंतर आज या राजकारणात नवीन ट्विस्ट पहावयास मिळाला.आघाडीचे सर्वेसर्वा प्रकाश धारीवाल यांना मानणाऱ्या घटकांनी एकत्र येऊन महाविकास आघाडीला पाठिंबा देण्याचा निर्णय घेतला.यामुळे माजी आमदार अशोक पवार यांनी महाविकास आघाडी निवडणूक लढविणार असल्याची घोषणा आज केली.धारीवाल यांच्या पारदर्शक कारभाराप्रमाणे कारभार करणार असाल तरच या निवडणुकीत नेतृत्व करेल असा इशाराही पवार यांनी यावेळी दिला.

धारीवाल यांनी यावेळी नगरपरिषद निवडणूक न लढविण्याचा निर्णय घेतल्याने शहरात प्रचंड अस्वस्थता पसरली होती.धारीवाल यांच्या या निर्णयामुळे आघाडीच्या माध्यमातून इच्छुक असलेले उमेदवार व्यथित झाले होते.अनेक अनेकांची निवडणूक न लढवण्याची मानसिकता झाली होती.(मात्र काही जणांनी काल झालेल्या भाजप बैठकीत हजेरी लावून उमेदवारीची मागणी केली.)या सगळ्या परिस्थितीत धारीवाल यांच्या काही निकटवर्तीयांनी तसेच शहरातील विविध स्तरातील मान्यवरांनी माजी आमदार पवार यांच्याशी संपर्क साधून शहराच्या भल्यासाठी पुढाकार घेण्याची विनंती केली.पवार यांनी लागलीच यास प्रतिसाद देत महाविकास आघाडीच्या वरिष्ठ नेत्यांशी चर्चा केली.या चर्चेनुसार त्यांनी आज आपली भूमिका पत्रकारांसमोर जाहीर केली.ते म्हणाले,धारीवाल यांनी निवडणूक न लढवण्याचा निर्णय जाहीर केल्यानंतर माझी ही मनस्थिती नव्हती.मात्र शहरातील विविध मान्यवरांनी संपर्क साधून निवडणुकीचे नेतृत्व करण्याची विनंती केल्यामुळे पुढाकार घ्यावा लागला. प्रसिद्ध उद्योगपती रसिकभाऊ धारिवाल यांनी आपल्या कालावधीत शिरूरची देशभरात ओळख निर्माण केली. यानंतर प्रकाशभाऊ धारीवाल यांनी देखील विकासाच्या माध्यमातून शहराचा नावलौकिक वाढवण्याचा प्रयत्न केला. व्यवसायाचा प्रचंड व्याप असताना देखील हे पिता पुत्र आपल्या गावासाठी कायम सक्रिय राहिले. शहराच्या विकासासाठी अनेकदा स्वनिधीचा वापर करून भ्रष्टाचारमुक्त कारभाराचा पाठ घालून दिला.यामुळे आज सर्वच पक्षाचे नेते धारिवाल कुटुंबीयांचे आदरपूर्वक नाव घेताना दिसतात.
रसिकभाऊ व प्रकाशभाऊ यांनी ज्या पद्धतीने नगरपरिषदेचा कारभार केला त्याच पद्धतीचा कारभार करणार असाल तरच मी या निवडणुकीत पुढाकार घेईल असा इशाराही माजी आमदार पवार यांनी यावेळी दिला.डॉक्टर, इंजिनियर ,वकील ,व्यापारी, शेतकरी ,कामगार तसेच गोरगरीब जनतेला सोबत घेऊन ही निवडणूक लढविणार असल्याचे भूमिका पवार यांनी मांडली.शहरातील ज्येष्ठ,अनुभवी मंडळीशी चर्चा करून शहर विकासाकडे नेण्याच्या दृष्टिकोनातून महाविकास आघाडी मार्ग  अनुसरेल असा विश्वासही पवार यांनी यावेळी व्यक्त केला. घोडगंगा साखर कारखान्याचे माजी संचालक पांडुरंगअण्णा थोरात, काँग्रेसचे तालुकाध्यक्ष वैभव यादव, शिवसेनेचे शहरप्रमुख (उबाठा) संजय देशमुख, माजी उपनगराध्यक्ष चंद्रकांत बोरा, जैन समाजाचे संघपती भरत चोरडिया, वकील संघटनेचे माजी अध्यक्ष ॲड.रवींद्र खांडरे यांनी यावेळी प्रातिनिधिक स्वरूपात महाविकास आघाडीला पाठिंब्याविषयी आपले मनोगत व्यक्त केले.माजी नगराध्यक्ष रवींद्र ढोबळे,काँग्रेसचे शहराध्यक्ष ॲड.किरण आंबेकर, राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष मुजफ्फर कुरेशी आदींसह मोठ्या प्रमाणावर शिरूर शहर विकास आघाडीचे समर्थक यावेळी उपस्थित होते.

 

महाविकास आघाडीच्या निर्णयामुळे शहर विकास आघाडीच्या समर्थकांना एकूणच शिरूरकरांना जणुकाही संजीवनी मिळाल्याचे चित्र आज पहावयास मिळाले.

Leave A Reply

Your email address will not be published.