शिरूरनामा न्यूज नेटवर्क
शिरूर :शहर विकास आघाडीच्या ” आशीर्वादा ”पासून वंचित झालेले आघाडी समर्थक विविध पक्षाच्या दारात जाऊन आपले नशीब आजमावत असल्याचे गमतीदार चित्र सध्या पाहावयास मिळत असून कोणाच्या दारातून विजयाचा मार्ग प्रशस्त होतो हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.
शहर विकास आघाडीचे सर्वेसर्वा प्रकाश धारीवाल यांनी निवडणुकीच्या रिंगणातून माघार घेतली. धारीवाल यांनी माघार घेतल्यामुळे आघाडीचे सहकारी माजी आमदार अशोक पवार यांनीही या निवडणुकीत रस दाखविला नाही.यामुळे धास्तावलेल्या आघाडीच्या समर्थक इच्छुकांमध्ये कमालीची अस्वस्थता पसरली होती.काही इच्छुकांनी लगेच पर्याय शोधण्यास सुरुवात केली.काही दिवसांपूर्वी भाजपाने वरिष्ठांच्या उपस्थितीत येथे बैठक घेतली. या बैठकीला आघाडीचे अनेक इच्छुक उपस्थित होते.तिथे त्यांनी पक्षाकडे उमेदवारीची मागणी केली. यात सर्वात महत्त्वाचा समावेश होता तो नगराध्यक्षपदासाठी.नगराध्यक्ष पद ओबीसी महिला राखीव असून यासाठी माजी नगरसेवक अभिजीत पाचर्णे यांच्या पत्नीच्या नावाची सुरुवातीपासूनच मोठी चर्चा आहे.ते धारीवाल यांचे खंदे समर्थक आहेत. धारीवालांच्या भूमिकेनंतर पाचर्णे यांनी भाजपचा पर्याय निवडून भाजपकडे आपल्या पत्नीसाठी उमेदवारी मागितल्याचे समजते.पाचर्णे यांच्या बरोबरच आघाडीच्या अनेक समर्थकांनीही भाजपकडे आपली नावे दिली असल्याचे समजते.
या घडामोडीनंतर सुरुवातीला या निवडणुकीत रस न दाखवलेल्या माजी आमदार पवार यांनी दोन दिवसांपूर्वी महाविकास आघाडी निवडणूक रिंगणात उतरणार असल्याचे जाहीर केले.यामुळे भाजपकडे उमेदवारी मागितलेले अनेक जण परवाच्या महाविकास आघाडीच्या पत्रकार परिषदेला उपस्थित असल्याचे दिसून आले.यापैकी अनेकांनी महाविकास आघाडीकडे उमेदवारी मागितल्याचे समजते.शहरातील विविध स्तरातील मान्यवरांच्या विनंतीमुळे महाविकास आघाडी निवडणूक रिंगणात उतरली आहे.यात जैन समाजाने मोठा पुढाकार घेतल्याचे दिसून येत आहे.नगरपरिषदेचे राजकारण बाहेरच्यांच्या हाती नको म्हणून माजी आमदार पवार यांना विरोध असलेले चेहरे देखील या आघाडीत सहभागी झाले आहेत.याचमुळे या आघाडीकडे उमेदवारी मागण्यांची संख्या वाढतानाचे चित्र आहे.माजी नगरसेविका अलका खांडरे या महाघाडीकडून नगराध्यक्ष पदासाठी इच्छुक आहेत.
दरम्यान आमदार माऊली कटके यांनीही येथील राष्ट्रवादी पक्षाच्या कार्यालयात इच्छुकांच्या मुलाखती घेतल्या.येथेही शहर विकास आघाडीचे अनेक समर्थक मुलाखतीसाठी उपस्थित होते.राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष शरद कालेवार हे धारीवाल यांचे कट्टर समर्थक आहेत.मात्र आता त्यांना पक्षाच्या भूमिकेसोबत जावे लागणार आहे.त्यांची पत्नी जिजामाता बँकेच्या उपाध्यक्ष,माजी नगरसेविका मनिषा कालेवार या पक्षाकडून नगराध्यक्षपदासाठी इच्छुक आहेत.शहर विकास आघाडीत भाजपा वगळता इतर बहुतांशी पक्षाची मंडळी एका छताखाली यायची.आता प्रथमच पक्ष पातळीवर हीच मंडळी आता एकमेकांसमोर लढताना दिसणार आहे.
भाजपा, राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) या दोन्ही पक्षांनी नगराध्यक्ष पदावर आपला दावा सांगितल्याने अद्याप तरी हे पक्ष एकत्र लढणार की नाही हे स्पष्ट झालेले नाही.त्यामुळे आजतरी दुरंगी,तिरंगी की चौरंगी लढत होईल सांगता येणार नाही.