आशीर्वाद घेतले;विचारही घेणार का?

0

शिरूरनामा न्यूज नेटवर्क 

शिरूर: नगरपरिषद निवडणुकीत माजी सभागृह नेते प्रकाश धारीवाल यांनी अलिप्त राहण्याचा निर्णय घेतला.मात्र तरीही निवडून आलेल्या बहुतांशी नगरसेवक मंडळींनी निकाल लागल्यावर धारीवाल यांचा आशीर्वाद घेतला.अगदी आमदार माऊली कटके यांच्यासह नवनिर्वाचित नगराध्यक्ष ऐश्वर्या पाचर्णे या देखील ” आशीर्वाद ” वर दाखल झाल्या.सर्वांनी आशीर्वाद घेतले खरे,धारीवाल यांचे स्वच्छ कारभाराचे विचार घेणार का?हा प्रश्न आहे.
           २००७ पासून  २०१७ पर्यंत नगरपरिषदेवर निर्विवाद वर्चस्व प्रस्थापित केलेल्या धारिवाल यांनी यंदाच्या निवडणुकीत सहभाग न घेण्याचा कठोर निर्णय घेतला.त्यांच्या या निर्णयापासून त्यांना परावृत्त करण्याचा खूप प्रयत्न करण्यात आला.मात्र ते आपल्या निर्णयावर ठाम राहिले.यानंतर भाजपा,राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना तसेच महाविकास आघाडीने आपापले उमेदवार निवडणूक रिंगणात उतरवले.विविध पॅनल असल्याने अनेक इच्छुकांनी मिळेल त्या पक्षाकडून उमेदवारी स्वीकारली.या निवडणुकीत विधानसभा निवडणुकीत आमने सामने लढलेले आमदार माऊली कटके व माजी आमदार अशोक पवार पॅनलच्या माध्यमातून पुन्हा आमने सामने आले.पवार यांनी राजकारणाचा कसलाही संबंध नसलेल्या भरत चोरडिया यांच्याकडे पॅनलच्या प्रमुखपदाची जबाबदारी दिली.चोरडिया हे जैन समाजाचे संघपती असल्याने हा पॅनल धारीवाल यांचाच असावा असा कयासही बांधण्यात आला.मात्र धारिवाल यांनी,आपला कोणालाही पाठिंबा नसल्याचे स्पष्ट केले.तरीही धारीवाल यांच्या नावाचा अप्रत्यक्षरित्या फायदा घेण्याचा प्रयत्न झाला.या निवडणुकीत विविध पक्षाकडून उमेदवारी स्वीकारलेले बहुतांशी उमेदवार ( नगराध्यक्ष पदासहीत )हे धारिवाल समर्थक होते.मात्र धारिवाल यांनी कोणालाही मदत केली नाही.मात्र निवडणुकीचा निकाल लागताच निवडून आलेले नगराध्यक्षसहित बहुतांशी नगरसेवकांनी ” आशीर्वाद ” गाठले.धारीवाल यांचे आशीर्वाद घेतले.विधानसभा निवडणुकीत धारीवाल यांनी माजी आमदार अशोक पवार यांचे काम केलेले असतानाही, आपल्या पक्षाचा (राष्ट्रवादी) उमेदवार निवडून येताच आमदार कटके हे नवनिर्वाचित नगराध्यक्ष ऐश्वर्या पाचर्णे व सहकाऱ्यांसमवेत धारिवालांच्या भेटीस गेले.एकंदरीत हे सर्व चित्र पाहता,प्रक्रियेत असो वा नसो नवनिर्वाचितांनी धारिवाल यांच्या प्रति आपली निष्ठा,प्रेम व्यक्त केले.
            नगरपरिषद कारभारात धारीवाल हस्तक्षेप करण्याची बिलकुल शक्यता नाही.मात्र त्यांच्या शब्दाला नगरपरिषदेत पूर्वी इतकाच मान असेल हे मात्र नक्की.कारण सर्व कारभारी त्यांचे समर्थक आहेत.मात्र निवडून आल्यावर आशीर्वाद घ्यायला गेलेली मंडळी पुढे किती आदर्शवत काम करतात, (धारीवाल यांच्या कालावधीत केले तसे;अर्थात अपवाद वगळता) हे पाहणे औत्सुक्याचे ठरेल.धारीवाल यांची सत्ता असताना कोणत्याही नगरसेवकाची चुकीचे काम करण्याची हिंमत होत नव्हती.(त्यातूनही काहींनी गुपचुप कार्यक्रम केला) बाबांनो,काही लागले तर माझ्याकडून घेऊन जा.चुकीचे काम करू नका असे शेवटपर्यंत धारीवाल हे नगरसेवकांना बजावत राहिले.त्यांचा आता थेट अंकुश राहिला नाही.त्यामुळे नवनिर्वाचितांनी आशीर्वाद घेतले खरे,धारीवाल यांचे स्वच्छ कारभाराचे विचार घेऊन ही मंडळी काम करणार का?हा प्रश्न आहे.;
Leave A Reply

Your email address will not be published.